E-Peek Pahani 2024 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक सूचना देण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत खरीप हंगामासाठी ई-पीक पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आता अवघे काही तास शिल्लक असून, शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या पिकाची ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणीसाठी 48 तासांची मुदत
शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा विमा, पिक कर्ज आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वाची भूमिका बजावते. या प्रक्रियेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंद सातबाऱ्यावर नोंदवून घेणे आवश्यक आहे. जर ई-पीक पाहणी करण्यात आली नाही, तर संबंधित क्षेत्राला पडीत मानले जाईल आणि शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.
शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता
शेतकऱ्यांनी पुढील 48 तासांत त्यांच्या शेतात जाऊन ई-पीक पाहणी करणे गरजेचे आहे. अन्यथा, शेतकऱ्यांना हमीभाव शेती योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यासाठी ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतःहून ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
शेतकऱ्यांनी वेळेवर ही प्रक्रिया पूर्ण करून शासकीय योजनांचा लाभ मिळवावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.